रायगड : धुळवडीचा सण साजरा करण्यासाठी आलेल्या ठाणे येथील तरुणाचा कर्जत येतील नदीत बुडून मृत्यू ( Death By Drowning In Karjat ) झाला. 20 वर्षीय अक्षय विनोद दोडिया असे या मृत तरुणाचे नाव असून, ते पाच जण कर्जत येथील खांडपे येथे एका रिसॉर्टवर मौज मजा करण्यासाठी आले होते. नदी पार करत असताना ही घटना घडली.
अंदाज आला नाही
ठाणे येथील अक्षय विनोद दोडिया व त्याचे अन्य साथीदार हे कर्जत खांडपे येथील सांगवी गावात हॉटेल रेडिसनच्या मागे असलेला ढेमढेरे रिसॉर्टवर धुळवड साजरी करण्यासाठी आज शुक्रवार दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आले होते. परंतु या तरुणांना चुकीची माहिती मिळाल्याने आपण बुकिंग केलेल्या रिसॉर्ट येथे जाण्यासाठी नदीतून मार्ग काढत असताना अक्षयला नदीच्या पात्राचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. त्याबरोबर त्याचा अन्य एक साथीदार देखील पाय घसरून पाण्यात पडल्याने नदीत पोहण्याचा आनंद घेणारे कर्जत येथील तरुणांनी पाहिले. त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्यात बुडालेल्या एका तरुणाला वाचवण्यात कर्जत येथील तरुणांना यश आले होते. मात्र अक्षय हा पाण्यात कुठे सापडून न आल्याने कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली होती.
टीमने घेतला शोध
यावेळी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी खोपोली येथील गुरुनाथ साठेलकर यांच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या टीमला बोलावण्यात आले होते. यावेळी पाच वाजण्याच्या सुमारास अक्षयला शोधण्यात अपघातग्रस्त टीमला यश आले. नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान यावेळी बुडालेल्या तरुणांना वाचवण्यासाठी गेलेल्या कर्जत येथील तरुणाला बुडणाऱ्या तरुणाने घट्ट पकडून ठेवल्याने त्याचे देखील नाकात तोंडात पाणी गेले होते. मात्र ह्या तरुणाला उपचारासाठी पनवेल येथे हलवण्यात आले आहे. तर एकूणच राज्यात धुळवडीचा सण साजरा होत असताना मात्र अक्षयच्या कुटुंबावर त्याच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.