रायगड - मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर देवदूत म्हणून काम करणारे 67 कामगार पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी उद्या 28 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा - पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यांसाठी 774 कोटी मदत
एक्सप्रेस वेवर अपघात झाल्यात तात्काळ सेवा देण्यासाठी आर्यन पम्प अँड इनव्हिरो सोल्युशन या कंपनीच्या माध्यमातून 2015 पासून देवदूत यंत्रणा काम करत आहे. मागील वर्षभरापासून देवदूतच्या कामगारांचा पगार वाढीचा प्रश्न रखडला आहे. मागील वर्षी देवदूत यंत्रणेने संपाचे हत्यार उपसल्यानंतर कंपनीने सामंजस्याने चर्चा करण्याची तयारी दर्शवली. मात्र, वर्षभरात कंपनीने कोणतीही चर्चा न केल्याने भारतीय मजदूर संघाने संपाची नोटीस बजावत गुरुवारपासून (28 ऑक्टोबर) बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामगारांची पगारवाढ, घरभाडे भत्ता, शिक्षण भत्ता, रेस्क्यू भत्ता, मेडिक्लेम अशा विविध 22 मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. कुसगाव येथील आयआरबी कंपनीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. तर, कंपनीने कामगारांच्या मागण्याचा तात्काळ विचार न केल्यास व या आंदोलनाच्या दरम्यान एक्सप्रेस वेवर काही अपघात झाल्यास त्याची मोठी किंमत अपघातग्रस्तांना चुकवावी लागणार आहे. मागील पंधरा दिवसांत घाट परिसरात अपघाताची मालिका सुरू आहे.
हेही वाचा - तरुणांना ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी युवक काँग्रेस राबवणार अभियान!