रायगड - साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या राज्य गुप्त वार्ता विभाग नियंत्रण कक्षातील 6 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कणेरकर यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कणेरकर यांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सुसाईड नोट मध्ये लिहिल्याचे समोर आले आहे. सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच चोरीचा आरोप केल्याने नैराश्य व शेरेबाजीला कंटाळून कणेरकर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
साहाय्यक पोलीस उपायुक्त श्रीमती अलकनूर, प्रशांत लांगी, स. आ. इनामदार, आर. व्हि. शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी या सहा जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा नागपूर - कॅन्सरग्रस्त पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या
16 ऑगस्ट 2019 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पोलीस मुख्यालय अलिबाग येथील विश्रामगृहात साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेतला होता. आत्महत्येपूर्वी कणेरकर यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. संबंधित घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी जलदगतीने तपास करण्याचे आदेश अलिबाग पोलिसांना दिले होते. कणेरकर यांनी सुसाईड नोट मध्ये काही अधिकाऱ्यांची नावे लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
2018 मध्ये प्रशांत कणेरकर हे राज्य गुप्तवार्ता विभाग नियंत्रण कक्ष,मुंबई येथे सेवेत रुजू होते. यावेळी सह अधिकारी प्रशांत लांगी यांचे पाकिट चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी कणेरकर यांच्यावर केला होता. तसेच चोरीची लेखी तक्रार प्रशांत लांगी यांनी एडिसी श्रीमती अलकनूरे यांकडे केली होती. लांगी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे एडिसी अलकनुरे यांनी प्रशांत कणेरकरांना मेमो देऊन लेखी उत्तर देण्यास सांगितले. यानंतर अलकनुरे, प्रशांत लांगी, इनामदार, आर व्ही शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी यांनी प्रशांत करणेकरांना या प्रकरणावरून टोमणे मारण्यास सुरुवात केली.
हेही वाचा सावकाराच्या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये एकाची आत्महत्या
दरम्यानच्या काळात प्रशांत कणेरकर यांची राज्य गुप्त वार्ता नियंत्रण कक्षातून रायगड पोलीस दलात बदली झाली. पोलीस मुख्यालयात काम करताना ते सुट्टी घेऊन मुंबईत गेले होते. परत आल्यावर नैराश्य आल्याने त्यांनी पोलीस मुख्यालय अलिबाग येथील विश्रामगृहमधील खोलीत गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
हेही वाचा जळगावात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
याबाबत फिर्याद पत्नी प्रतीक्षा कणेरकर यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के डी कोल्हे करत आहेत.