रायगड - कन्यादान योजनेत तत्कालीन प्रकल्प अधिकारी रावसाहेब मोकाशी व नामदेव पाटील यांनी संगनमताने साहित्य वाटपात 6 लाख 80 हजाराचा भ्रष्टाचार केल्याच समोर आले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन पेण आदिवासी प्रकल्प विभागातील भ्रष्टाचार अजून सुरूच असल्याचे समोर आले आहे.
आदिवासींच्या विविध योजनांसाठी सन 2004 ते 2009 या कालावधीत विविध योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर, फसवणूक, गैरव्यवहार झाल्याचे समितीने चौकशी अहवालात नमुद केले आहे. याआधी 13 लाखाचा अपहार केल्याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात 1 मे रोजी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. 2 मे रोजी अजून एका योजनेत भ्रष्टाचार झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन प्रकल्प अधिकारी रावसाहेब मोकाशी व नामदेव पाटील यांनी संगनमताने कन्यादान योजनेत भ्रष्टाचार केला आहे. रायगड जिल्हयातील १०० दाम्पत्यांना वस्तूचे वाटप करण्यासाठी शासकीय निधीतून 22 कॅरेट सोन्याचे 100 मंगळसूत्र, भांडी प्रत्येकी 100 नग, ब्लॅकेंट, टॉवेल, चादर, बेडशिट, संतरंजी प्रत्येकी 100 नग, जोधपूरी शूज, लेडीज कोल्हापुरी चप्पल प्रत्येकी 100 नग, असा माल खरेदी करून फकत 32 नग विवाहीत जोडप्यांना साहीत्यांचे वाटप करून उर्वरीत जोडप्यांना साहित्य वाटप न करता 6 लाख 80 हजार रूपये इतक्या शासकीय रकमेचा अपहार केला आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील हे अधिक तपास करीत आहेत.