रायगड - भारत संचार निगम कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सरकारने स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील ४०२ पैकी २५६ कर्मचाऱ्यांनी निवृत्ती स्वीकारली आहे. मात्र, अचानक एवढे कर्मचारी कमी झाल्याने कामाचा ताण आता उर्वरित १४६ कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. कर्मचारी नसल्याने यामुळे ग्राहकांचीही गैरसोय होणार आहे.
या कर्मचाऱ्यांवर आता जिल्ह्यातील १३ दुरध्वनी केंद्रांचा भार पडणार आहे. अलिबाग विभागात एकाच वेळेला १९ कर्मचार्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. २७ कर्मचार्यांपैकी अवघे सात कर्मचारीच सेवेत उरल्याने आता ही भली मोठी इमारत सुनीसुनी पहावयास मिळणार आहे. निवृत्त होणार्या कर्मचार्यांमध्ये सर्वाधिक ११ लाईनमनचा समावेश आहे. त्यांच्यानंतर सुमारे २ हजार कनेक्शनचा भार पेलण्यासाठी अवघे ५ लाईनमनच उरले आहेत.
हेही वाचा - BSNL च्या तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे समारंभाचे आयोजन करून सामूहिकरीत्या निरोप देण्यात आला. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने केंद्र शासनाच्या या कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - '...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'
कमी झालेल्या या कर्मचाऱ्यांमुळे दुरध्वनी, इंटरनेट सेवा आणखी डबघाईला जाण्याची शक्यता आहे. लँडलाईन सेवेच्या दुरुस्तीसाठी आऊटसोर्सिंग करण्यात आलेली नसल्याने याचा परिणाम ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागणार आहे. मागील ५ वर्षात बीएसएनएलची सेवा अनेकदा खंडित झाली. खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत या सरकारी कंपनीच्या कर्मचार्यांची चांगलीच दमछाक होत होती. अशाही परिस्थितीत हे कर्मचारी काम करीत होते. सतत वाढत जाणार्या आर्थिक तोट्यामुळे पगार देणे परवडत नसल्याचे कारण देत भारत दूरसंचार निगमने निवृत्ती योजना जाहीर केली होती.
हेही वाचा - भाजप नेते 'रावण की औलाद', तर काँग्रेस नेते 'गांधीजींचे नकली भक्त...'
जिल्ह्यात सध्या ऑप्टीकल फायबर लाईन, लीज लाईनची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने केली जात असून मोबाईल कनेक्टीव्हीटीचे आऊटसोर्सिंग पूर्ण झालेले आहे. याशिवाय येत्या मार्चपर्यंत ४ जी सेवा रायगडमध्ये सुरू होईल, असा अंदाज आहे.