रायगड - राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली की, त्वरित ऑक्सिजनची गरज भासू शकते. या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यामुळे आपला जीव गमावण्याच्या घटनाही राज्यात अनेक ठिकाणी घडत आहे. हे ध्यानी घेऊन शासनातर्फे रायगड आणि ठाणे जिल्ह्यात 200 मेट्रिक टन ऑक्सिजन साठवणूक केंद्र उभारण्यात येणार आहे. कोकणासाठी माणगाव तर, मुंबई, पालघर, नवी मुंबईसाठी ठाणे याठिकाणी केंद्र उभारले जात आहे. त्यामुळे रायगड आणि ठाणे जिल्हे प्राणवायू पुरविणारे जिल्हे ठरणार आहेत.
रायगड जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्राणवायू कमी पडू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोकण आयुक्तांनीही याला प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर माणगाव येथे 200 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा केंद्र उभारण्याची परवानगी दिली आहे. प्राणवायू साठ्याचा उपयोग हा रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही होणार आहे.
राज्यात पूर्वी 80 टक्के उद्योग तर, 20 टक्के आरोग्य यंत्रणेला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. कोरोनाचे महासंकट पाहता यात बदल करण्यात आला आणि 80 टक्के आरोग्य यंत्रणेला तर, 20 टक्के उद्योग क्षेत्राला पुरवठा केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
रायगड जिल्ह्यात ऑक्सिजनचा मुबलक साठा -
रायगड जिल्ह्यात रुग्णांना लागणारा ऑक्सिजन साठा हा मुबलक प्रमाणात आहे. जिल्ह्यासाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांसाठी 37 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. सद्यस्थितीत रुग्णांसाठी 3 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा लागत आहे. अलिबाग आणि माणगाव येथे 6 मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू आहे. तसेच माणगाव येथे 200 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा केंद्र उभारण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कोविड परिस्थिती -
जिल्ह्यात सध्या 6 हजार 70 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन सुविधेसह 1 हजार 191 बेड असून सद्यस्थितीत 224 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आयसीयूचे 313 बेड आहेत. त्यात 21 रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड सेंटरमध्ये 3 हजार 837 बेड उपलब्ध असून त्यात सद्यस्थितीत 406 रुग्ण, कोविड हेल्थ सेंटरमध्ये 1 हजार 722 बेड असून त्यात सद्यस्थितीत 950 रुग्ण आणि डेडिकेटेड रुग्णालयात 470 बेड असून त्यात 320 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 296 जण घरीच उपचार घेत आहेत.