रायगड - जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 57 जणांना कोरोना लागण झाली आहे. आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या कुशल नेतृत्वामुळे 16 रुग्ण कोरोनाच्या लढाईत यशस्वी झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात 39 कोरोनाबाधित असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनच्या अगोदर रायगड जिल्ह्यात अनेक चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यातील 519 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने काही प्रमाणात कोरोनाला थांबवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. आरोग्य यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी अहोरात्र कोरोनाबाधितांची सेवा करत आहेत.
जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका हद्दीत 25, पनवेल ग्रामीण 3, उरण 4, श्रीवर्धन 5, नेरळ 1 तर पोलादपूर 1 अशा एकूण 39 कोरोनाबाधितांवर पनवेल येथे उपचार सुरू आहेत. पनवेल आणि पोलादपूर येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात पॉझिटिव्ह असलेले 16 जण हे पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद आणि पोलीस यांच्या समन्वयाने जिल्ह्यात कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी होताना दिसत आहे.