रायगड - कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व कामधंदा, वाहतूक सेवाही बंद झाल्याने परराज्यातील हजारो नागरिक हे ठिकठिकाणी अडकून पडले. रायगड जिल्ह्यातही कामानिमित्त आलेले हजारो परराज्यातील नागरिक हे अडकले आहेत. या अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना त्याच्या गावी पोहोचविण्यासाठी शासन आणि प्रशासनाने आता पावले उचलली आहेत. अलिबाग, मुरुड तालुक्यातून ओडिशा राज्यातील 154 नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनामार्फत आज त्याच्या गावी पाठविले आहे. यावेळी या नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.
अलिबाग, मुरुड तालुक्यातील अडकलेल्या 154 जणांना आज अलिबाग येथून सहा एसटी बसने पनवेल येथे सोडण्यात आले असून तेथून ते विशेष रेल्वेने ओडिसाकडे रवाना होणार आहेत. या सर्वांना निर्जंतुकीकरण केलेल्या एसटी बसेसमध्ये खाण्याचे पाकीट, पाणी, मेडिकल तपासणी करून ओडिशाकडे रवाना केले. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, अलिबाग आगर प्रमुख, महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस यावेळी उपस्थित होते.