दौंड(पुणे) - नितेश राणे यांनी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दौंड युवासेना जोरदार आक्रमक झाली. नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कुत्र्याच्या गळ्यात नितेश राणे यांच्या नावाची पाटी अडकवण्यात आली. आज सकाळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी युवासैनिक, शिवसैनिकांनी हे अनोखे आंदोलन केलं.
राज्यात सध्या गलिच्छ राजकारण केले जात असून वेळोवेळी राणे कुटुंबीय हे शिवसेनेवर आरोप करून शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध युवा सेनेच्यावतीने करण्यात आला. नितेश राणे यांच्या वक्तव्याने तमाम शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भाजप जसे सांगेल तसे नितेश राणे बोलत आहेत, असं मत समीर भोईटे यांनी व्यक्त केलं.
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख देविदास दिवेकर, उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, युवासेनेचे निलेश मेमाणे, समीर भोईटे, निरंजन ढमाले, राहुल फडके,अभिजित शेलार, विकास रणदिवे, फैझ सय्यद व इतर युवासैनिक, शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.