पुणे - पिंपरी-चिंचवडमधील पाच गिर्यारोहक तरुणांनी ४०० फूट उंच वानरलिंगी सुळक्यावर चढून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांना श्रद्धांजली वाहिली. अरुण सावंत यांनी देखील वानरलिंगी सुळका सर केला होता. मात्र, शनिवारी (१८ जानेवारी)ला त्यांचा हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यामुळेच त्यांना वानरलिंगी सुळक्यावर चढून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पिंपरी-चिंचवडमधील मोहन हुले, ज्ञानेश्वर फुगे, किरण गावडे, तुषार खताळ या तरुणांनी जुन्नर-मुरमाड तालुक्याच्या सीमेवरील सह्यादी पर्वत रांगेतील जीवधन किल्ल्याशेजारी असणाऱ्या वानर लिंगी सुळका सर करण्याचा चंग बांधला. सुळका हा सुमारे ४०० फूट उंच आहे. त्यावर जाऊन अरुण सावंत यांना श्रद्धांजली वाहायची होती. वानर लिंगी सुळक्याजवळ गेल्यानंतर हार्णेस, रोप, हेल्मेट असे साहित्य वापरत सुरक्षेची काळजी तरुणांनी घेतली आणि बुधवारी सुळका सर करण्यास सुरुवात केली.
तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणांनी वानरलिंगी सुळका सर केला. तिथे जाताच अरुण सावंत यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर देशाचा तिरंगा फडकवला. अरुण सावंत यांचे गिर्यारोहण क्षेत्रात खूप मोठे काम आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्या जाण्याने दुःख झाले आहे. त्यामुळे सुळका सर करून अनोख्या पद्धतीने अरुण सावंत यांना श्रद्धांजली वाहिली, असे गिर्यारोहक ज्ञानेश्वर फुगे या तरुणाने सांगितले. तसेच वानर लिंगी सुळका सर करणे फार कठीण काम आहे. गिर्यारोहक अरुण सावंत यांनी हा सुळका सर केलेला आहे. त्यांना त्याच माध्यमातून श्रद्धांजली द्यायची होती. त्यामुळे गीतेश बांगरे आणि तुषार खताळ या दोघांच्या मार्गदर्शनाखाली वानरलिंगी सुळका सर केला. वानरलिंगी सुळका हा चारशे फुटांपेक्षा उंच हा सुळका आहे, असे गिर्यारोहक गीतेश बांगरे याने सांगितले.