पुणे - पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. सौरभ मलिक, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो सध्या लोणावळा शहरात राहण्यासाठी होता.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा त्याच्या ३ मित्रांसह पवना धरण परिसरात पर्यटनासाठी गेला होता. येथे तो धरणाच्या पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला तत्काळ पवना नगर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दर शनिवारी आणि रविवारी असंख्य पर्यटक पवना धरण परिसरात पर्यटनासाठी येतात. ते सर्व पवना धरणाकडे आकर्षित होतात. त्यातून अशा जीवघेण्या घटना घडत असल्याचे वारंवार समोर आले आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी व पोलिसांचा हलगर्जीपणा याला जबाबदार आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- सात महिन्यानंतर पुणे शहरातील उद्याने उघडली, नागरिकांची तुरळक गर्दी