पुणे - विश्वासात घेत तरुणीचे नग्न फोटो घेतले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. बिरेंद्रसिंह मॅथॉन (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, आरोपी मॅथॉनची आणि पिडीत तरुणीची ओळख एका जनरल स्टोअरवर झाली. त्यानंतर त्याने तरुणीशी जवळीक साधून मैत्री केली. मोबाईल नंबर घेऊन तिला तो व्हाट्सऍप कॉल करू लागला. एका दिवशी त्याने तिला पिंपरीत भेटण्यास बोलावले. तेव्हा, आरोपीने इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत असून अनेक नावाजलेल्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत असल्याचे सांगितले. तुला यात काम करायचे आहे का? अशी विचारणाही केली. त्यावेळी तरुणीने नकार दिला. त्यानंतर पुण्यात दाक्षिणात्य अभिनेत्रींसोबत इव्हेंट करत असून तुला यात सहभागी व्हायचे असेल तर नग्न फोटो काढून पाठव, असे सांगितले. तरुणीने नग्न फोटो कशाला हवेत? असा उलट सवाल केला असता आमची टीम तरुणींना निवडते, त्यांना ते पाहण्यासाठी लागतात, असे आरोपीने सांगितले. त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवत तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये नग्न फोटो काढत आरोपीच्या व्हाट्सऍप नंबरवर पाठवले.
मात्र, त्यानंतर त्याने तरुणीकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर नग्न फोटो व्हायरल करून बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली. तरुणीने घाबरून नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे घेऊन आरोपी मॅथॉनला दिले. त्यानंतर तो अशाच प्रकारे वारंवार फोन करून पैसे मागत होता. इतक्यावरच न थांबता त्याने तरुणीचे एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड घेतला. एटीएमने आणि प्रत्यक्ष, असे तब्बल ९० हजार रुपये त्याने तरुणीकडून उकळले. तरुणीने त्याच्या त्रासाला कंटाळून भोसरी पोलीस ठाणे गाठले असता याचवेळी आरोपीचा फोन आला आणि त्याने तरुणीकडे ८ हजार रुपयांची मागणी केली. तरुणीला आरोपीला दापोडी येथे बोलावण्यास पोलिसांनी सांगितले. साध्या वेशात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर संबंधित तरुणीची फसवणूक केल्याची कबुली त्याने दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.