पिंपरी-चिंचवड (पुणे) - लॉकडाऊनमध्ये मोबाईल स्क्रिनवर घुटमळण्याची सवय जणू प्रत्येकालाच लागली आहे. अशातच सोशल मीडियावर अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली, की अनेकजण ती रिक्वेस्ट तातडीने स्वीकारतात. त्यानंतर संवाद सुरू होतो, ती त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात खेचते. अन काही क्षणांत ती नग्न व्हायला सांगते अन इथेच ती व्यक्ती फसते. असाच एक प्रकार पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे घडला आहे. एका 24 वर्षीय तरुणाला व्हिडीओ कॉलच्या जाळ्यात फसवण्यात आल्याचे पुढे आले आहे.
तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल -
पिंपरी चिंचवडमध्ये 24 वर्षीय तरुणाला एका सुंदर तरुणीने व्हाट्सऍपवर मेसेज पाठवले. त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. तरुणीने या तरुणाला नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. काही कळण्याच्या आत तिने स्वतःचे कपडे काढले, अन अवघ्या काही सेकंदात त्याची अब्रू काढणारा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या प्रकाराने घाबरून गेलेल्या तरुणाने पोलिसांत धाव घेत तरुणीविरुद्ध आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला.
अशा प्रकारचे 107 गुन्हे दाखल -
जानेवारी ते मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील 107 व्यक्तींनी असे गुन्हे दाखल केले आहेत. राजस्थान, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या तिन्ही राज्याच्या सीमेवरून ही लुबाडणूक सुरू असल्याचे, पोलीस तपासात समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये मोबाईलवर वेळ घालवणे हा एक सवईचा भाग झाला असून यातून नको ते उपद्व्याप करावेसे वाटतात. याचाच फायदा या टोळ्या घेत असून अनेकांना त्यांच्या जाळ्यात खेचत आहेत.
हेही वाचा - झाडाची फांदी पडली तरुणाच्या डोक्यावर, अंध आईवडिलांचा एकुलता एक आधार गेला