पुणे: जीतो कनेक्ट २०२२ (Jito Connect 2022) आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरद पवार यांच्या हस्ते प्राईड ऑफ पुणे (Pride of Pune) पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जीतो अॅपेक्सचे व्हाईस चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योजक विजय भंडारी यांना प्राईड ऑफ पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंग जेम ऑफ जीतो पुरस्काराने क्रीडापटू प्रियम तातेड, सामाजिक बांधिलकी पुरस्काराने सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार, सामाजिक कार्यासाठी विमल बाफना, उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने पिनॅकल उद्योग समुहाचे डॉ. सुधीर मेहता आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्ता शिक्षण संस्थेचे डॉ. संजय चोरडिया आणि युवा उद्योजक पुरस्कार बांधकाम व्यावसायिक सॉलिटेअरचे प्रमुख अतुल चोरडिया यांना गौरविण्यात आले. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. तसेच जीतो पुस्तिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले.
संकटात जैन समाज नेहेमी पुढे : पवार म्हणाले, संकटात जैन समाज नेहमी पुढे असतो. कोविड काळात त्यांनी केलेले कार्य समाज कधीही विसरू शकणार नाही. पूर्वी देशातील श्रीमंतांच्या यादीत टाटा आणि बिर्ला यांचे नाव यायचे. आता जैन समाजातील गौतम अदानी यांनी हे स्थान पटकावले आहे. जैन समाज म्हणजे व्यापार असेच समीकरण आहे. कारण त्यांच्या भावी पिढीला लहानपणापासून व्यापाराचे शिक्षण मिळते. मात्र, नवी पिढी आयएएस आणि आयपीएस होत सनदी अधिकारी म्हणून नाव काढत आहे. जैन समाजाने देशासाठी खूप काम केले आहे.
प्रशासकीय क्षेत्रासाठी प्रशिक्षण : पत्नी, भाऊ आणि परिवार तसेच मित्रांची साथ मिळाल्याने सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात काम करू शकल्याची कृतज्ञता जीतो अॅपेक्सचे व्हाईस चेअरमन विजय भंडारी यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर व्यक्त केली. अर्थ, शिक्षण आणि सेवा या क्षेत्रात जीतो काम करत आहे. जैन समाजातील तरुण प्रशासकीय क्षेत्रात यावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम जितोच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती जीतो अॅपेक्सचे चेअरमन गणपतराज चौधरी यांनी दिली.
हेही वाचा : Video : पुण्यात कुमार विश्वास यांची कवितेच्या माध्यमातून राजकीय पक्षांवर फटकेबाजी