पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेकडून 6 लाख रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शिवाय सहा गुन्हे उघड झाले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. विदया गंगाधर धोरात असे या महिलेचे नाव आहे.
याआधी सहा ठिकाणी चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ज्वेलर्स दुकानात जाऊन दागिने घेण्याचा बहाणा करायची. तिथे दुकानदाराची नजर चुकवुन सोन्याचे दागिने चोरुन पोबारा करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अशा प्रकारे संबंधित महिलेने सांगवी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण सहा ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता.
सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले
आरोपी महिलेने ज्या ठिकाणी चोरी केली होती तिथल्या सीसीटीव्हीचा आधार घेऊन सांगवी पोलिस आरोपीपर्यंत पोहचले. सांगवी पोलिसांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बोऱ्हाडे, अरुण नरळे, विजय मोरे, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, शिमोन चांदेकर, गुत्तीकोंडा, निलम गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा - पुण्याच्या किरकटवाडी परिसरातून तोतया लष्करी अधिकारी अटकेत