पिंपरी-चिंचवड ( पुणे) - ऑस्ट्रेलियावरून आलेले गिफ्ट दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकारी सोडत नसल्याचे सांगून, अज्ञात व्यक्तीने संगणक अभियंता महिलेला 25 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेला आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल 25 लाख रुपये भरायला लावले. हर्षदा निलेश हळदिकर (वय29, रा. बालेवाडी स्टेडीयम जवळ, म्हाळुंगे, मुळगाव मिरज, सांगली) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली महिलेची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियावरून तुमच्यासाठी महागडं गिफ्ट आल्याची माहिती आरोपीने या महिलेला दिली. आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. या गिफ्टची किंमत अंदाजे 80 लाख असल्याचेही आरोपीने या महिलेला सांगितले. मात्र हे गिफ्ट महागडं असल्याने दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी गिफ्ट सोडत नसल्याचेही आरोपीने या महिलेला सांगितले. गिफ्ट हवे असल्यास 65 हजार रुपये भरण्याची मागणी आरोपीने केली. या महिलेने पैसे भरले मात्र, आरोपी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेकडून पैसे घेतच राहीला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पैसे भरण्यासाठी महिलेने बँकेतून काढले कर्ज
या महिलेने आरोपी मागत असलेली रक्कम भरण्यासाठी दोनदा बँकेतून कर्ज काढलं, पहिल्यावेळेस 5 लाखांचे लोन काढले, तर दुसऱ्यावेळेला 6 लाखांचे लोन काढले. आरोपीच्या बँक खात्यात 25 लाख रुपये भरून देखील तो अजून पैशांची मागणी करत होता. अखेर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.