पुणे (शिक्रापूर) - येथील चाकण चौक परिसरात ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्यासाठी कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी मद्यधुंद अस्वस्थेत आढळून आला. तसेच, मद्यधुंद अवस्थेत असताना त्याच्याकडे शासकीय वाहन असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली
शिरुर येथील चाकण चौकात रविवार (३१ मे) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस विभागातील (एम एच १२ टी एच २८९२) हे शासकीय वाहन एका तासापेक्षा जास्त वेळ चाकण शिक्रापूर रस्त्यावर रस्त्याचे मध्यभागी उभे असताना, त्या वाहनातील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नागरिकांना दिसून आले. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हावलदार शंकर साळुंके, पोलीस नाईक हरीश शितोळे, ब्रम्हा पोवार, विजय देशमुख घटनास्थळी दाखल झाले. त्याच्याकडील वाहण ताब्यात घेत या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले. दरम्यान, नागरिकांचे वाहन रस्त्यावर उभे असताना, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर कारवाई करणारे पोलीस आता या वाहनावर, तसेच चालकावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.