पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने 12 किलो 300 ग्रॅम गांजा पकडला. त्याची किंमत जवळपास 3 लाख 7 हजार रुपये आहे. तसेच याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. राजेंद्र सुरेश पवार (वय-21, रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक हे निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी शाकीर जेनेडी आणि संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार राजहंस बिल्डिंग समोरील पेरूची बाग परिसरातून राजेंद्र पवार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 3 लाख 7 हजार किंमतीचा 12 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले, पोलीस कर्मचारी शाकीर जेनेडी, संदीप पाटील, प्रदीप शेलार, दिनकर भुजबळ आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.