पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला यात राष्ट्रवादी काँग्रेसला 17 काँग्रेसला 2 तर भाजपला 2 जागा मिळाल्या 21 पैकी 14 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीत भाजपचे प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीचे सुरेश घुले यांचा पराभव केला. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मी माझी भूमिका मांडली ..
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की राज्यात कोण काय बोलला याची उत्तरे दयायला मी काही मोकळा नाही. मी माझं मत मांडत असतो.मी माझी भूमिका मांडली आहे.कुठल्याही परिस्थिती ओबीसींच्या बद्दलचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय निवडणूका घेण्यातच येऊ नये.त्या ही घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे.अशी आमची भूमिका आहे.हा मुद्दा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही तर मध्य प्रदेशमध्ये देखील अश्याच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे.ओबीसींच्या बाबतीत निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे.आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे तो सर्वठिकाणीच मान्य होतं. अस देखील यावेळी पवार म्हणाले.
मी चर्चा करायला तयार
शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केलेल्या आरोपवर देखील पवार म्हणाले की तो आमचा मित्र पक्ष आहे.शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी तयार केली आहे.आढळराव यांनी कश्यामुळे हा मुद्दा समोर आणला आहे हे मला माहित नाही.त्यांन माझ्याशी चर्चा करायची असेल तर मी कधीही चर्चेला तयार आहे.आणि त्यांचा काही गैरसमज दूर झाला असेल तर ते ही दूर करायला तयार आहोत.असं देखील यावेळी पवार म्हणाले.
ही निवडणूक पक्ष विरहित होती
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकित राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं प्रवीण दरेकर यांना मदत केली यावर पवार म्हणाले की सहकारात कधीही पक्षाच्यावतीने कधीही निवडणूक लढविल्या जात नाही.तिथं पक्षाचे चिन्ह नसतात तर त्यांचे आपापले चिन्ह असतात.त्यानुसार मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकित देखील जर संचालक बोर्डावर नजर टाकली तर वेगवेगळ्या पक्षाच्या संचालक आतमध्ये काम करत असतात.त्यामुळे ही निवडणूक पक्ष विरहित होती.आणि त्यांनी एकत्र बसून तो निर्णय घेतला अस देखील यावेळी पवार म्हणाले.