पुणे - पुण्यात 30 जानेवारी रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी याच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान एल्गार परिषद 2021 च्या आयोजकांनी एक परिपत्रक जारी केले असून, एल्गार परिषदेचे आयोजक म्हणून आम्ही शरजिल उस्मानी सोबत ठामपणे ऊभे असल्याचे याद्वारे सांगितले आहे.
शरजिल उस्मानी याने या कार्यक्रमात बोलताना 'हिंदुस्थानमे हिंदू समाज बुरी तरह से सड चुका है' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर एल्गार परिषदेचे आयोजक बी. जी. कोळसे पाटील यांनीही शरजिलच्या या वक्तव्याबाबत माफी मागितली होती. शरजिलने मनुवाद ऐवजी हिंदू शब्द वापरला आणि ही त्याची चूक झाली असे म्हणत कोळसे पाटील यांनी माफी मागितली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उस्मानी याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर उस्मानी याच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हटले आहे पत्रामध्ये?
एल्गार परिषदेच्या आयोजकांकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ''शरजिल उस्मानी एक 23 वर्षांचा मुस्लिम तरुण, मुस्लिम यासाठी नमूद करावं लागतं कारण, फक्त आणि फक्त त्याच्या धर्मामुळे आज त्याला इतक्या विकृत, हिंस्र आणि द्वेषपूर्ण तऱ्हेने लक्ष केलं जात आहे. त्याच्या भाषणातील काही वक्तव्यावरून ब्राह्मणवाद्यांकडून जो काही वादंग उभा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, त्यावर भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानतर्फे 'एल्गार परिषदेचे' आयोजक म्हणून ही अधिकृत भूमिका आम्ही जाहीर करत आहोत. आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक म्हणून शरजिल उस्मानीसोबत ठामपणे उभे आहोत"