पुणे - राज्यात सध्या भीषण पाणी टंचाई असून या परिस्थितीचा सामना करणाऱ्या गावांची कसरतच सुरु आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी येथे असलेल्या उंच डोंगर रांगातल्या या धरणात दशकभरातील सर्वात नीचांकी पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून शेती व पिण्यासाठी पाणी रे टनेलद्वारे बंद पाईपलाईनमधून पुरवठा केले जाणार आहे. अशा पद्धतीचे हे महाराष्ट्रातील एकमेव धरण आहे.
नगर कल्याण महामार्गावरून उत्तरेला १० किलोमीटरवर सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेले हे चिल्हेवाडी धरण आहे. या धरणाची क्षमता फक्त ०.९० टीएमसी आहे. असे असूनही तालुक्यातील २१ गावांची शेती मोठ्या काटकसरीने याच पाण्यावर पिकवली जात आहे. दरवर्षी मे महिना अखेरीस या धरणात चांगला पाणीसाठा असतो यंदा मात्र हा पाणीसाठा फक्त १२ टक्केच्या आसपास म्हणजेच खूपच अत्यल्प आहे. धरणाचे मुख्य दरवाजे उघडे पडले असून रे टनेलद्वारे बंद पाईपलाईनमधून शेतीला पाणीपुरवठा केले जाणार आहे. यामुळे पाणीसाठा टिकून असतो, मात्र यंदा तो मोठ्या प्रमाणावर घटला आहे.
मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही आणि धरण १०० टक्के भरूनही वातावरणातील उष्णता वाढल्याने पाण्याचा बाष्पीभवनावर परिणाम झाला आहे. लवकरच शेतीसाठी पाणीटंचाई भेडसावणार असल्याच चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना जुन्नर परिसरातील नेहमी भरभरून वाहणारी धरणं यंदा मात्र प्रथमच अल्प पाणीसाठ्यावर आहेत.पुढील काळात येणाऱ्या पाण्याचे संकट आता सह्याद्रीच्या डोंगर रांगातही दिसत आहे.