पुणे: पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडीच्या मुख्य रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. महानगरपालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याचे दिसत आहे. संबंधित कंत्राटी कामगारांनी याबद्दल अधिकाऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र, आज रविवार असल्याने कोणीही घटनास्थळी फिरकले नाही.
काळेवाडी फाटा ते डी मार्ट रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेजचे काम सुरू आहे. दरम्यान, आज खोदकाम करत असताना जलवाहिनी फुटली. यात हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. याबाबत माहिती देऊनही महानगरपालिका प्रशासनाने पाणी बंद करण्याची तसदी घेतली नाही. अडीच तास जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू होता. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. असे असतानाही हजारो लिटर पाण्याच्या नासाडीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे नाकरिकांनी संताप व्यक्त केला.