नारायणगाव (पुणे) - पुणे नाशिक महामार्गावर एक बुलेट विनाचालक धावत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भर दिवसा विनाचालक गाडी धावत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्याने आपली बोटे तोंडात घातली. तर या अनोख्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
त्याचं झालं असं की एक भंगार व्यावसायिक आपल्या बुलेटवरून सुसाट निघाले होते. मात्र रस्त्याने पायी चाललेल्या जनार्दन दत्तू गांजवे(वय ४७, गांजवेवाडी, ता. जुन्नर) यांना या महाशयांच्या बुलेटची धडक बसली. गांजवे या धडकमुळे गंभीर जखमी झाले. मात्र बुलेटस्वार देखील बुलेटवरून खाली कोसळला. बुलेट मात्र अजूनही रस्त्यावर धावत होती. मग झाली पंचायत, ही बुलेट तब्बल तीनशे फूट पुढे भरधाव वेगाने गेली. यामुळे महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार पहिला मिळाला. ही घटना ९ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे बोलले जात आहे. ही घटना येथील एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अपघातानंतर बुलेटस्वार खाली पडला मात्र बुलेट महामार्गावरून सुमारे तीनशे फूट पुढे भरधाव वेगाने गेली. त्यानंतर ती एका मालवाहतूक जीपला आडवी जाऊन महामार्गाच्याकडेला जाऊन खाली पडली. यावेळी जीप चालकाने प्रसंगावधान दाखवून जीप थांबवली. यामुळे महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार पहिला मिळाला.
हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 ऑगस्टपासून शाळा सुरु, अशा असतील मार्गदर्शक सूचना