पुणे - एकीकडे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने 'वंचित वारकरी सन्मान यात्रा' सुरू केली आहे. संत तुकोबांच्या देहूतून निघालेली ही यात्रा सोलापूरच्या अरण येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिरापर्यंत निघणार असून ही यात्रा पाच दिवस चालणार आहे.
पाच दिवसांच्या या यात्रेत हडपसर, भिगवण, पंढरपूर, मोहोळ आणि माढा येथील मंदिर, मदरसे आणि बुद्ध विहारात विसावा घेतला जाईल. या यात्रेमार्फत वंचित आघाडीकडून वारकरी विद्यापीठ आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येईल. त्याचबरोबर याप्रकरणी वंचित आघाडी त्यांची भूमिका देखील मांडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होईल.
हेही वाचा- संकटात सोडून मित्रांनी घेतला काढता पाय; शिवदुर्ग रेस्क्यू टीमने वाचवले तरुणाचे प्राण
लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांनी दलित आणि मुस्लिमांची मूठ बांधली. पण त्यात म्हणावे तितके यश आले नाही. त्यातच एमआयएमने स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. म्हणूनच आता वारकरी सांप्रदायाकडे वंचितने त्यांचा मोर्चा वळवला आहे, असे बोलले जात आहे.