पुणे - मद्यपान करण्यासाठी घरफोडी आणि दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले असून साथीदाराला अटक केली आहे. दोघांकडून 3 लाखांच्या 10 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रकाश हरिदास पाटील (वय 23, राहणार पाण्याच्या टाकीजवळ कैलासनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात मद्यपान करण्यासाठी घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले तर साथीदार मित्राला अटक केली आहे. आरोपी प्रकाश आणि अल्पवयीन मुलगा या दोघांना मद्यपान करण्याची सवय असून त्यांनी यातूनच वेगवेगळ्या परिसरातून रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाक्या चोरल्या आहेत. तर, काही ठिकाणी घरफोडी केल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले आहे. घरफोडी आणि दुचाकी चोरून विक्री केलेल्या पैशांमधून दोघेही मद्यपान करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यांतर्गत 1 घरफोडी, वाकड पोलीस ठाण्यांतर्गत 2 वाहन चोरीचे गुन्हे, पिपरी पोलीस पोलीस ठाण्यांतर्गत 1 वाहनचोरी, हिंजवडी पोलीस ठाणे 1 वाहनचोरी, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील 1 वाहनचोरी असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, उर्वरित 5 वाहनांबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, सिध्दनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बापुसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, सुरज सुतार, नितीन गेंगजे यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पाटस येथे फुटली