बारामती (पुणे) - आपत्कालिन परिस्थिती व वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तसेच अगदी घटना घडत असताना पीडित व्यक्तींना तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
बारामती उपविभागामधील १७० गावांमध्ये ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आत्पकालिन परिस्थितीमध्ये तातडीने मदत व तपासकामामध्ये वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व गांवामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रत्यक्ष संकटकाळात म्हणजे आग, चोरी, दरोडा, लहान मुले हरविणे, महिलांची छेडछाड, वाहनचोरी, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात, वन्यप्राणी हल्ला आदी घटनांमध्ये तातडीने जवळपास असणाया नागरिकांशी तात्काळ संपर्क साधून मदत मागवणे ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे शक्य होणार आहे.
ग्रामस्थ आपला मोबाईल नंबर आपल्या गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणेत नोंदवल्यानंतर ही यंत्रणा सबंधीत ग्रामस्थांला वापरता येते. या १८००-२७०-३६०० वर नोंदणी केलेल्या ग्रामस्थाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो ग्रामस्थांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाचा माहिती मिळते. त्यामुळे तातडीने पीडित व्यक्तीला मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्रामसुरक्षा यंत्रणा गावात सुरू कशी करावी
प्रत्येक गावामध्ये पोलीस ठाण्याकडून ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांची एकत्रित सभा घेऊन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते. पंचायत समिती कार्यालयात स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांना ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रात्याक्षिक देण्यात येते. ज्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा गांवामध्ये कार्यान्वित करण्यासंदर्भात प्रति कुटुंब एका वर्षासाठी ५० रुपये एवढा खर्च येणार आहे.
चोरी, दरोडे यांना आळा बसण्यास सुरूवात
ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या चोऱ्या, दरोडे, अनुचित प्रकार टाळण्यासाठी वेगाने यंत्रणा काम करते. सबंधित व्यक्तीने ग्रामसुरक्षा यंत्रणेस संपर्क साधला असता तत्काळ सबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामस्थ रस्त्यावर येऊन चोरट्यास ताब्यात घेतात. या यंत्रणेमुळे चोरी, दरोडे यांना आळा बसण्यास सुरूवात झाली असल्याचे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.
सहा पोलीस ठाण्यांचा समावेश
बारामती उपविभागातील वडगाव निंबाळकर, बारामती शहर, बारामती तालुका पोलीस ठाणे तर इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहर, वालचंदनगर व भिगवण या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गावांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
ग्रामसुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
- यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
- संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश स्वरुपात परिसरातील नागरिकांना माहिती मिळते.
- दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
- नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरीत्या प्रसारित होतात. नियमाबाह्य दिलेले संदेश व अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
- एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य होते.
- वाहनचोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो. संदेश पुढील १ तास पुन्हा-पुन्हा ऐकण्याची सोय.
- सरकारी कार्यालये, पोलीस ठाणे आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना, गावांना किंवा कर्मचाऱ्यांना एकाचवेळी सूचना देता येते.