पुणे - एमआयएमसोबत आम्ही बोलणी बंद केलेली नाहीत. त्यांनीच टाळे लावले आहे तर काय करणार. टाळ्याची चावी त्यांच्याकडेच आहे. माझे ओवैसी यांच्याशी चांगले संबंध आहेत, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षाच्या ताणलेल्या संबंधावर भाष्य केले. पुण्यामध्ये आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या विकास अजेंडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकर बोलत होते.
मुख्यमंत्री आम्हाला विरोधी पक्ष म्हणून घोषित करून मोकळे झाले. मात्र, आम्ही सत्तेत येणार आहोत, असे आंबेडकर म्हणाले. राज्यात 288 जागा लढवण्याची आमची तयारी आहे. येत्या 2 दिवसात यादी जाहीर करू, असे देखील आंबेडकरांनी स्पष्ट केले. राज्यात सत्तेवर आलो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर असलेले दुष्काळाचे संकट कायमचे दूर करणार. सह्याद्रीतील धरणांचे पाणी पूर्वेकडे वळणार. हा आमचा महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा - दम भरणारेच झाले नरम... शिवसेनेची सपशेल शरणागती
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जात पाहून उमेदवार देतात. मात्र, आम्ही बाहेरचे उमेदवार घेत नाही आणि त्यांना तिकीट देत नाही. आम्ही चळवळीतले आहोत, भावनिक राजकारण करत नाही. एमआयएमशी आम्ही बोलणी बंद केलेली नाही, त्यांनी टाळे लावलंय त्याला आम्ही काय करणार, असे देखील आंबेडकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा - आठवडाभरात पेट्रोल १.६० रुपयाने महागले! सलग सातव्या दिवशी दरवाढ सुरूच