पुणे - अनेक राज्यात मंदिरे खुले असताना गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील देवी-देवता सरकारच्या ताठर भूमिकेने बंदिवासात आहेत. कृष्णरुपी विठ्ठल, सत्यभामा, रुक्मिणी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणुका आणि वणीगडची सप्तशृंगी बंदिस्त असताना लक्ष्मीपूजनला कुठल्या लक्ष्मीचे पूजन करणार? असा सवाल वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. तसचे देव बंदिस्त असताना कसली दिवाळी साजरी करताय? या शब्दांत त्यांनी सरकारी धोरणांचा तीव्र निषेध केला.
देऊळ बंद का..?
राज्यातील दारूची दुकाने, भाजीमंडई, हॉटेल, धाबे, लग्न समारंभ सुरू झाले आहेत. मात्र, मंदिरे, वारी, भजन सप्ताह यांच्यावर अद्यापही बंदीच ठेवण्यात आली आहे. असे असताना आमचा देवच जर बंदिस्त असेल तर आम्ही गोडधोड करुन दिपावली सण साजरा करायचा कसा? 'देवाविना दिवाळी नाहीच', असे म्हणत सरकारने मंदिरे खुली करण्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - तुळजापूर मंदिर परिसरातील आंदोलकांचा तंबू हटवला; पोलिसांनी परवानगी नाकारली
यंदाची दिवाळी साजरी करु नका -हिंदू धर्मात देवीदेवतांचा प्रत्येक व्यक्तीशी प्रत्यक्ष संबध असतो, असे असताना आपले देवीदेवता बंदिवासाच्या दुःखात असताना समाजात आता दिपावली सण कुठल्या आनंदात आपण साजरा करणार आहे, असा प्रश्न समाजातील प्रत्येक व्यक्तीला बंडातात्या कराडकर यांनी विचारला आहे. तसेच यंदाची दिवाळी आनंद व्यक्त न करता साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्तिकी वारी संदर्भात लवकर मार्गदर्शक सूचना काढावी -
कोरोना महामारी संकट काळात आषाढीवारीत सहभागी न होता माऊलींना घरातून निरोप देऊन साजरी केली. वारीत सहभागी न होण्याचे दुःख वारकरी संप्रदायासह प्रत्येक नागरिकाने सहन केले आणि आता कार्तिकीवारी तोंडावर आली आहे. या वारीवरही बंदीचे सावट येऊ नये, यासाठी सरकारने वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार करावा. कार्तिकी वारीला संपूर्ण महाराष्ट्रातुन पंढरीकडे दिंड्या येत असतात. हा दिंडी सोहळा साजरा होणार असताना सरकारने वारकऱ्यांच्या वारीबाबत भावना समजून घेऊन सरकारने ताठर भूमिका न घेता कार्तिकी वारी परंपरेप्रमाणेच साजरी करण्याची परवानगी द्यावी, तसेच तत्काळ मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी केली आहे.