पुणे - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील देवस्थानांकडून ससून रुग्णालयाला आर्थिक मदतीचा हात देण्यात येत आहे. तीन दिवसात एक कोटींची रक्कम जमा झाली आहे. ससून रुग्णालयाच्या आवारात एक अकरा मजली इमारत बांधून तयार आहे. या इमारतीचे कोविड-19 हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी राज्यभरातील देवस्थानांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर राज्यभरातील देवस्थानांकडून तीन दिवसात एक कोटीहून अधिक निधी जमा करण्यात आला आहे. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट कडून बारा लाखाचे व्हेंटिलेटर, जेजुरी मार्तंड देवस्थान कडून 51 लाख रुपये, गोंदवलेकर महाराज देवस्थान कडून 25 लाख रुपये, चिंचवड देवस्थान कडून 21 लाख रुपये, पुण्यातील शंकर महाराज मठाकडून पाच लाख रुपये, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान कुठून 2 लाख 51 हजार, तर सोलापूर येथील एका दानशूर व्यक्तीने दहा लाखाचे सॅनिटायझर उपलब्ध करून दिले.
धर्मदाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी पुणे विभागातील सर्व देवस्थानांना आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले होते.