पुणे - पुणे शहरात साधारण 120 लसीकरण केंद्र आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये साधारण 70 लसीकरण केंद्र आहेत. या सर्वच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी लसीकरण सुरू आहे. पुणे शहरात लसीकरण बंद असल्याने नागरिक हवाल दिल झाले आहेत.
हेही वाचा - पाण्याचा टँकर पुरवण्याच्या वादातून व्यावसायिकाची कोयत्याने वार करुन हत्या, बघा सीसीटीव्ही फुटेज
आवश्यक इतका लसीचा पुरवठा होत नसल्याने राज्य सरकारने यापूर्वीच 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण स्थगित केले आहे. शहरात लसीची उपलब्धता नीट होत नसल्याने शहरात दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनाच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता लसच उपलब्ध नसल्याने नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन हवालदिल होऊन परतत आहेत. दरम्यान, पुण्यातील लसीकरण मोहिमेवरून गेल्या काही दिवसांत राजकीय साठमारी देखील पहायला मिळाली. शहराला आवश्यक लस ग्लोबल टेंडर भरून घेण्याबाबत चर्चा सुरू असताना राज्य सरकार पुणे शहराला ग्लोबल टेंडरसाठी परवानगी देत नसल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्या गटनेत्याने केला होता, तर महापालिकेने अशी परवानगी घेण्याची आवश्यकताच नसल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.
आता पुन्हा महापालिकेकडून लस उपलब्धतेसाठी ग्लोबल टेंडर साठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पुण्यात 13 मे रोजी 12 हजार 574 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, 14 तारखेला 7 हजार 816, 15 मे रोजी केवळ 1 हजार 492 आणि 16 मे रोजी 1 हजार 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एकीकडे महापालिकेकडून ग्लोबल टेंडरसाठी प्रयत्न सुरू असताना आता खासगी रुग्णालये देखील लस उत्पादकांकडे मागणी नोंदवून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, सध्या तरी पुणे शहरातले लसीकरण ठप्प असून येत्या दिवसांमध्ये तरी लस उपलब्ध होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
हेही वाचा - पुण्यातील 'त्या' वादग्रस्त अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या १०० जणांची येरवडात रवानगी