बारामती (पुणे) - बारामती शहर व तालुक्यातील खासगी तसेच शासकीय सुमारे ३ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
पाच पथके तैनात -
आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना रूग्णांशी जवळून संपर्क येत असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ५ पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये १ व्हॅक्सीनेटर (प्रत्यक्ष लस देणारा) सोबत ४ सहकारी असणार आहेत. त्यानुसार २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना आज पुणे येथे लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील १ हजार २७८ शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकिय क्षेत्रातील २ हजार २०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रूई येथील शासकीय महिला रूग्णालय व सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. यासाठी लसीकरण कक्ष उभा करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.
शारीरिक तपासणी करून दिली जाणार लस -
लस घेण्यापूर्वी सबंधीत आरोग्य कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, होमगार्ड, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना लस दिली जाणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात साठवर्षांवरील व्यक्तींना तसेच मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी योग्य वेळी सूचना देण्यात येतील, असेही वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.
हेही वाचा - विशेष : कुस्तीचे आखाडे सुरू; अशा प्रकारे पैलवानांनी स्वतःला ठेवले तंदुरुस्त...