पुणे - ए ग्रेड पुणे महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे. पत्रे लिहिली, निवेदने दिली, आक्रोश मांडला तरीही महापालिका अजूनही जागी होईना आणि उरुळीकरांची दैना संपेना. यासाठी ग्रामस्थांनी आज एकत्र येत काळी फित लावून पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने आपआपल्या घरासमोर आणि चौकाचौकात एकत्र येऊन डोक्यावर हंडा घेऊन निषेध व्यक्त केला. लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही. मंतरवाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइनने पाणी सुरू करावी, अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे करूनही कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे आजचे हे आंदोलन करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कोरोनामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, अजून टँकरभोवती गर्दी जास्तच वाढत आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे. ऊरूळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेला आहे. शिवाय 10 दशलक्ष लिटरची पाण्याची टाकीही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसांपासून तयार आहे. कचरा डेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे ऊरुळी देवाची गावास का केला जात नाही. सद्याची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर आहे.
पुण्यातील वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोनाला थांबवू शकतो. त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे. तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी यावेळी केला.
टॅंकरवर पाणी भरणे धोक्याचे आहे, शिवाय सद्या पावसाळी दिवस असल्यामुळे अजूनही लोकांना त्रास होऊ शकतो. यामुळे लोकांना कोरोनाची लागण होवू शकते. त्यासाठी महापालिकेला जबाबदार धरले जाईल. आठ दिवसात बंद नलीकेद्वारे पाणी गावाला सुरु करण्यात यावे. अन्यथा उरुळी देवाची गावातील ग्रामस्थ अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व उरुळी देवाची गावचे माजी उपसरपंच व भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केले. यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब नेवसे, यासह उरुळी देवाची ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने चौकाचौकात एकत्र येऊन निषेध करत होते.