पुणे - शहरात सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पावसाने संपूर्ण पुणे शहराला झोडपून काढले. रविवारीही सायंकाळच्या सुमारास पुणे शहरात पावसाने हजेरी लावली होती.
आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिक दुकानदार आणि ग्राहक यांची धावपळ उडाली. तर काही ठिकाणी काल अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडालेल्या पुणेकरांनी आज मात्र पावसाचा अंदाज बांधत छत्री रेनकोट अशा तयारीनिशी घरा बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज अचानक आलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.
शहरातील सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, सदाशिव पेठ, बाणेर, पाषाण, औंध, नगर रस्ता या संपूर्ण परिसरात पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे, या विषयी माहिती देत असताना हवामान विभागाने सांगितले की, विदर्भ आणि मध्य प्रदेशात मागील दोन ते तीन दिवसांपासून चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. याशिवाय तामिळनाडूचा दक्षिण किनारपट्टी परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील दोन दिवसही पूर्ण ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा - बारामतीत जोरदार पावसासह गारपीट
हेही वाचा - हे माझं चुकलं का?.. नगरसेवकाचा सत्ताधारी भाजपला घरचा आहेर