पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काळ्या फिती बांधून निषेध केला. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने चप्पल फेकली. यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण बनले होते.
भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीमार केला आहे. रविवारी (दि. 6 मार्च) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णा नगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन झाले. त्यापूर्वी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्यानाच्या समोरच काळे झेंडे, काळ्या फिती दाखवून भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक झाले.
अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत केला लाठीमार - त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन मोदी, मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर आले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्यावर लाठीमार केला आहे. यावेळी सर्वांची पळापळ झाली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्यानात प्रवेश करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तेव्हाच अज्ञात व्यक्तीने त्याच्या वाहनांच्या दिशेने चप्पल फेकली. कोणी चिल्लर लोक असतील, असे चप्पल फेकल्या प्रकरणी फडणवीस यांनी म्हटले.