पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकही दाखल झाले. तेव्हा बॅगेत कपडे वगळता काही नसल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (दि.30 जाने.) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या समोर घडली आहे.
यबाबात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील पोलीस उपायुक्त कार्यालया समोर पदपथावर (फुटपाथ) एक बेवारस बॅग असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पिंपरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास केला. बेवारस बॅग असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी श्वान पथक बोलावून श्वानाच्या सहायाने तपासणी केली.
घटनास्थळी 'बीडीडीएस'चे पथक दाखल
पोलिसांनी सतर्कता म्हणून पुण्यातील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. त्या पथकाने आणलेल्या उपकरणाद्वारे बॅगेची तपासणी करण्यात आली. बॅगेत काहीच नसल्याचे निष्पन्न झाले. हा सर्व घटनाक्रम तब्बल दोन तास सुरू होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
हेही वाचा - यंदाच्या बजेटकडून महिलांच्या अपेक्षा काय आहेत?