पुणे : गेल्या काही दिवसांपासून पठाण या चित्रपटातील गाण्यात जी भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावरून वाद निर्माण झाला असून हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका काही हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. आता या चित्रपटावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ( Union Social Justice Minister Ramdas Athawale ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आंदोलनाचा दिला इशारा : मंत्री रामदास आठवले म्हणाले की, पठाण चित्रपटाला आमचं विरोध नाही. पण चित्रपटात भगव्या रंगाला बेशरम रंग अस गाणं आणि वक्तव्य आहे. भगवा रंग हा जसा भाजप शिवसेना यांचा आहे तसाच तो आमच्या गौतम बुद्धांच्या चिवरचा रंग देखील भगवा आहे. आणि अडीच हजार वर्षापूर्वी हा रंग शांततेचा रंग म्हणून पुढे आणण्यात आला. हा आमच्या बौद्ध धर्माचा देखील अपमान आहे. या चित्रपटातील बेशरम हा शब्द काढला पाहिजे अन्यथा आमचा पक्ष देखील या चित्रपटात विरोधात आंदोलन ( agitation against Pathan film ) केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मंत्री आठवले यांनी दिला आहे. पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते.
समान नागरी कायद्याचे समर्थन : समान नागरी कायद्याबाबत मंत्री आठवले म्हणाले की समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा आहे. कारण हा कायदा कुठल्याही धर्माविरोधात नाही. पॉप्युलेशन कंट्रोल होणे अत्यंत आवश्यक आहे आणि यामुळे आरक्षण जाणार नाही. ते आबाधित राहणार आहे. समान नागरी कायद्यामुळे आरक्षण जाणार हे म्हणणे चुकीचेच आहे. आणि जर आरक्षण गेले तर आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही पण यामुळे आरक्षण जाणार नाही, असे यावेळी आठवले म्हणाले.
भीमा कोरेगाव प्रकरणी गुन्हे मागे घ्यावेत : १ जानेवारीला भीमा कोरेगाव मध्ये लाखो संख्येने आंबेडकर अनुयायी येतात. दलितांच्या, महारांच्या शौऱ्याची आठवण तिथे आहे. स्तंभ येथे सभा घेता येणार नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आमचा या निर्णयाला विरोध नाही. आजूबाजूला ज्यांना सभा घ्यायची आहे तिथे सभा घेण्यात यावी याची परवानगी देण्यात यावी याबद्दल मी जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे. काही राहिलेल्या केसेस तिथल्या लोकांवर आहेत. त्या केसेस उठवाव्यात, अशी आम्ही मागणी करत आहोत असे यावेळी मंत्री आठवले म्हणाले.
कॉंग्रेसने भारत जोडला नाही : राहुल गांधी यांच्याबाबत आठवले यांनी आपली भूमिका मांडली ते म्हणाले की, राजकीय वातावरण एनडीएसाठी चांगले आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत राहावी. भारत जोडण्याची आवश्यकता नाही, भारत बाबासाहेबांनी संविधानाने जोडला गेला आहे. काँग्रेसकडे सत्ता होती. मात्र त्यांना गांधी, बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी होती. पण ती त्यांनी नाही केली. काँग्रेसने भारत जोडला नाही, म्हणून राहुल गांधी यांना ही वेळ आली. बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे यावेळी आठवले म्हणाले. बिलावाल भुट्टो यांनी आठवण ठेवली पाहिजे की त्यांच्या आईची हत्या आतंकवाद यांनी केली. भारताशी त्यांनी चांगले नाते ठेवायला पाहिजे. मोदी यांची तुलना लादेनशी करणे म्हणजे चुकीची आहे. त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन नाही : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत आठवले म्हणाले की, चंद्रकांत दादा राज्यातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी जे वक्तव्य केले होते त्या वक्तव्याशी कोणीही सहमत नाही. त्यांनी भीक हा शब्दप्रयोग केला त्यामुळे लोकांना रोष आहे मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो की ज्या भीम सैनिकांवर ३०७ कलम लावले आहे ते मागे घ्या. आता ते मागे घेतले आहेत. हा विषय लांबावणे योग्य नाही. सर्वांनी शांतता ठेवणे आवश्यक आहे, असे देखील यावेळी आठवले म्हणाले.