पुणे - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी सरकार बनवण्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उल्हास बाबट यांनी पुण्यात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ही माहिती दिली.
हेही वाचा - भिमाशंकर येथे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त करण्यात आली विद्युत रोषणाई
एकीकडे राष्ट्रपती राजवट लागू असतानाही मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता स्थापनेसंदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. मंगळवारी रात्री साडेआठपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसंदर्भात दावा दाखल करण्याची मुदत राज्यपालांनी दिली होती. मात्र, दुपारीच राष्ट्रवादीकडून ही मुदत 48 तासांसाठी वाढवून देण्याची मागणी केल्याचे पत्र राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठवले. याच आधारावर राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. मात्र, आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या आहेत.
हेही वाचा - राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता कमी - ज्येष्ठ विधिज्ञ भास्कर आव्हाड
राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अडचण येणार आहे. तसेच राज्यपालांनी काँग्रेसला संधी नाकारून चूक केली, राज्यात 6 महिने राष्ट्रपती राजवट राहू शकते. त्याबरोबरच दरम्यानच्या काळात बहुमत सिद्ध करणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापण्याची संधी मिळू शकते, असे बापट यांनी सांगितले.