पिंपरी-चिंचवड (पुणे) - तळेगाव एमआयडीसी येथे बळजबरीने लॉजवर देहविक्री व्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपीला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या असून दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. जॉन प्रकाश राव ऊर्फ आण्णा, एजंट नामे सागर यांच्या विरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1976 चे कलम 3, 4, 7 तसेच भारतीय दंड विधान कलम 370 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकूळे यांना माहिती मिळाली की, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जॉन प्रकाश राव हा त्याच्या लॉजवर तरुणींकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेत आहे. यावरून पोलीस पथकाने एका बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवले. रूम बुक केली असता एक मुलगी ग्राहकाच्या रूममध्ये आली. त्यावेळी सामाजिक सुरक्षा पथकाने लॉजवर छापा टाकला. यात 24 आणि 21 वर्षीय अशा दोन तरुणींची सुटका करण्यात आली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, विशेष अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, कर्मचारी सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, अनिल महाजन, अमोल शिंदे, वैष्णवी गावडे, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे यांच्या पथकाने केली.