बारामती - बारामती शहरात शुक्रवारी (दि.५ मार्च) भरदिवसा दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज क्षणार्धात सगळीकडे पसरले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलिसांनी नाका-बंदी करीत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात पद्मावती सुभाष शहाणे (रा.तांदुळवाडीवेस, बारामती) यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी सायंकाळी ५ ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेत पद्मावती शहाणे व कल्पना जवळेकर यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी या महिला रस्त्याने पायी जात असल्याचे पाहिले. दुचाकी पुढे नेत पुन्हा माघारी वळवून आणली. महिलांंजवळ गाडी आल्यावर कट मारत गाडीवर मागे बसलेल्याने गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले. या घटनेत १३ ग्रॅम वजनाचे २० हजार रुपयांचे एक गंठण व २.५ ग्रॅम वजनाची ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरट्यांनी हिसकावून नेली.
हेही वाचा - ''बायोबबल तोड आणि...'', मालिकाविजयानंतर अश्विनच्या बायकोची प्रतिक्रिया