पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. ज्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढून अनेक नद्यांना पूर आला आहे. शिरुर तालुक्यातून वाहत जाणाऱ्या भीमानदीलाही महापूर आल्याने मांडवगण फराटा ते वडगाव रासाई दरम्यान असलेल्या रस्त्यावरती पुराच्या पाण्यात कांद्याने भरलेले दोन ट्रक अडकले आहेत.
रात्रीच्या वेळेस चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने हे ट्रक पाण्यामध्ये अडकले. सध्या या दोन्ही ट्रकच्या केबिनपर्यंत पाणी आले असून ट्रक नगर जिल्ह्यातील निघोज येथील असल्याचे म्हटले जात आहे. या ट्रकमधील कांदा पाण्याने खराब होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निघोजवरून आलेले हे कांद्याचे ट्रक मांडवगण फराटा मार्गे काष्टीच्या दिशेने बाजारात निघाले होते.
दरम्यान स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने ट्रक चालकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र या ट्रकमधील कांद्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला आहे.