पुणे - दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच मारामारी झाल्याचा प्रकार घडला. पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. फाईल देण्या-घेण्याच्या वादातून पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई यांच्यामध्ये वादावादी होऊन हातपायीपर्यंत हे प्रकरण गेले.
कोरोना संसर्गामुळे सध्या सायबर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातूनच हा वादावादीचा प्रकार घडला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. संबंधित पोलीस हवालदारावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्याने सर्वांसमक्ष सहकारी पोलीस शिपायाला बेदम मारहाण केल्याची चर्चा सुरू आहे. हा प्रकार घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेमधील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलीस उपायुक्तांनी संबंधित विभागाकडून माहिती घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.