पुणे - हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस घाटात ही घटना घडली. या अपघातात नवनाथ दगडू जाधव (वय 34,रा. निरनिमगाव. ता. इंदापुर ) व तात्याराम जगन्नाथ राऊत ( वय 34. रा. लाखेवाडी ता. इंदापूर ) या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे ही मित्र होते. ते कामानिमित्त पाटसला आले होते, अशी प्राथमिक माहिती मिळली आहे.
हायवा चालक फरार -
पुणे-सोलापूर महामार्गावरून पाटस बाजुकडून कुरकुंभ बाजुला प्रवास करत असलेल्या दुचाकीला समोरून विरूध्द दिशेने येणाऱ्या हायवा टिपर ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर हायवा ट्रक चालक वाहन जागीच ठेवून फरार झाला.
पाटस पोलिसांची घटनास्थळी धाव -
या अपघातानंतर दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत महामार्गाच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे, प्रदिप काळे,सागर चव्हाण, विजय भापकर, पोलीस मित्र सोनबा देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलवले.
उपचारापूर्वीच मृत्यू -
पाटस टोल नाक्यावरील रूग्णवाहीकेला पाचारण करून या अपघातातील जखमींना खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. दरम्यान, याबाबत अमित अरूण पवार (रा. मोरेवस्ती दौंड ) यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिली असून पोलिसांनी हायवा ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - राज्यात शुक्रवारी 25 हजार 681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद