पुणे: पुण्यातील वाघोली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वाघोली येथील मोझे कॉलेज रस्ता येथील एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचाऱ्यांचा चेंबरमध्ये काम करताना गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वाघोली येथील बाय रोडवरील सोसायटीमध्ये चेंबरमध्ये काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गोड (वय ४५ वर्षे), गणेश भालेराव (वय २८ वर्षे), सतीशकुमार चौधरी (वय ३५ वर्षे) या तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
चेंबरमध्ये उतरून काम करत होते: मोझे कॉलेज रस्ता येथील सोसायटीचे चेंबर साफ करण्यासाठी हे तिघे सकाळी चेंबरमध्ये उतरून काम करत होते. बराच वेळ झाला तरी हे कामगार दिसत नाही तसेच त्यांचा काही आवाजही येत नाही म्हणून स्थानिकांनी सकाळी 7 वाजता पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाच्या माध्यमातून शोध कार्य करण्यात आले. फायर ब्रिगेडचे विजय महाजन, अक्षय बागल, मयूर गोसावी, चेतन समशे, तेजस सागरे, नितीन माने, संदीप शेळके, अभिजीत दराडे, विकास पालवे यांच्या टीमने त्यांचा शोध सुरू केला आणि चेंबर मधून 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी लोणीकंद पोलिसांचे पथकही दाखल झाले आहे.