आंबेगाव (पुणे) - मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मामा आणि भाच्याचा बुडून मृत्यू झाला. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे ही घटना घडली. मासेमारी करताना चिखलात अडकल्याने दोघांचाही मृत्यू झाला. संजय शिवराम केदारी (वय 32) आणि ऋषिकेश विजय काळे (वय 8) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मंचर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
जालन्यात सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू -
जालन्यात २ नोव्हेंबरला दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथील ज्ञानेश्वर बहुले आणि त्यांचा परिवार नेहमीप्रमाणे रविवारी देखील शेती कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ज्ञानेश्वर बहुले यांनी वैष्णव (वय 13) आणि गौरव (वय 10) या मुलांना घरी जाण्यास सांगितले. मुले घरी निघाली पण ती घरी पोहोचलीच नाहीत. ज्यावेळी मुलांची आई घरी आली त्यावेळी मुले घरी पोहोचली नसल्याचे लक्षात आले, त्यानंतर मुलांची शोधाशोध सुरू झाली. काही वेळात दोन्ही मुले शेततळ्यात बेशुद्धावस्थेत सापडली. मात्र, उपचारासाठी नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला.