राजगुरुनगर (पुणे) - कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या फावल्या वेळात खेड तालुक्यातील दोन चिमुकल्या शाळकरी मुलांनी आपल्या अपंग वडिलांसाठी टाकाऊ वस्तूंपासून बॅटरीवर चालणारी विनाप्रदूषणाची तीन चाकी गाडी तयार केली आहे. या गाडीची चावी अपंग वडिलांना सुपूर्त केल्यानंतर वडिलांनी मुलांच्या मेहनतीचे कौतुक केले.
खेड तालुक्यातील वाडा हे गाव डोंगराळ भागातील गाव म्हणून ओळखले जाते. या गावात राहणारे पोपट तनपुरे दुचाकी गाड्यांचे गॅरेज चालवतात. त्यांची दोन मुले प्रणव व सोहम शाळेत जातात. पोपट तनपुरे हे लहानपणापासूनच अपंग आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास थांबला होता. यावर मार्ग काढण्यासाठी त्यांच्या प्रणव व सोहम या दोन चिमुकल्या मुलांनी युट्युबवर बॅटरीवर चालणाऱ्या गाडीचे व्हिडीओ पाहून टाकाऊ वस्तूंपासून तीन चाकी गाडी तयार केली.
वीज व सौरऊर्जेवर चार्जिंग करता येणार
पेट्रोलच्या वाढत्या किमती परवडत नसल्याने वडिलांच्या गॅरेजमध्ये भंगार म्हणून पडलेल्या वस्तू एकत्र करून प्रणव व सोहम यांनी तीन चाकी गाडी तयार केली. यामध्ये वडील पोपट तनपुरे यांचेही मार्गदर्शन घेतले. या गाडीला तीन चाके, दोन बॅटऱ्या देण्यात आले आहे. या गाडीला चार्जिंगसाठी दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले असून याचे वीज आणि सौरऊर्जेवर चार्जिंग करता येणार आहे. त्यामुळे जवळजवळ विनाखर्चच ही तीन चाकी गाडी रस्त्यावर धावणार असल्याचे प्रणव तनपुरे यांनी सांगितले.
हेही वाचा - शासनामार्फत फक्त प्रतापगडावर साजरा होणार शिवप्रताप दिन; इतर ठिकाणचे कार्यक्रम रद्द
वडिलांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी दोन भावंडांचा प्रयत्न
लहान वयातही मुलांना आपल्या पालकांच्या परिस्थितीची जाण असते याच परिस्थितीतून संस्काराचे धडे गिरवत चिमुकली मुले ही यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करत असतात असाच प्रयत्न वाडा येथील दोन शाळकरी मुलांनी करून दाखवला आहे वडिलांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी दोन चिमुकल्या मुलांनी बॅटरी व सौरउर्जेवर चालणारी गाडी तयार केली आहे आणि ही गाडी प्रणव व सोहम यांनी वडिलांना सुपूर्त केली यावेळी वडील पोपट तनपुरे हे भावनिक झाले होते.
सुट्टीचा वेळ खर्ची करत बनवली बॅटरीवर चालणारी गाडी
पोपट तनपुरे यांच्या अपंगत्वामुळे लहान असल्यापासूनच या चिमुकल्या मुलांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. वडिलांच्या गॅरेजमध्ये त्यांना मदत करून संसाराचा गाडा हाकण्यात चिमुकली मुले हातभार लावत आहेत. लॉकडाऊनच्या काळात मिळालेला फावला वेळ प्रणव व सोहम तनपुरे या चिमुकल्यांनी वाया न घालवता या काळात गॅरेजमध्ये पडलेल्या टाकाऊ वस्तूंपासून बॅटरीवर चालणारी गाडी तयार केली. या गाडीचा वापर घरगुती साहित्य, शेतमाल वाहतूक व वडिलांच्या प्रवासाला उपयोगी होणार असल्याचे प्रणव तनपुरे यांनी सांगितले.
हेही वाचा - पुणे विदयापीठात आता गिर्यारोहणाचे धडे.. विद्यापीठ पातळीवर अभ्यासक्रमाचा समावेश