बारामती- क्षणिक रागाच्या भरात केलेले कृत्य दोन चिमुकल्यांच्या जीवावर बेतल्याचा प्रत्यय याचा प्रत्यय आज पहाटे बारामतीत आला. नवरा बायकोमध्ये झालेल्या भांडणानंतर आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या विवाहीतेच्या प्रयत्नात दोन चिमुकल्यांचा अंत झाल्याची घटना घडली. मात्र, विवाहीता यात वाचली आहे.
आईला वाचवण्यासाठी चिमुकल्यांची पाण्यात उडी
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील पिंपळी येथील अतुल सूर्यवंशी व अंजली सूर्यवंशी (रा. पिंपळी, ता. बारामती) या दोघांमध्ये काही कारणाने वादावादी झाली. रागाच्या भरात पिंपळी येथील खाडीच्या पाण्यात आत्महत्येचा निर्णय अंजली सूर्यवंशी यांनी घेतला. पहाटे तीनच्या सुमारास राग अनावर असल्याने त्या वेगाने पाण्याकडे गेल्या. त्यांनी पाण्यात उडी मारल्यानंतर त्यांची दोन मुले दिव्या (वय 4) व शौर्य (वय 2) त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या पाठोपाठ आली. आईला वाचवण्याचा प्रयत्नात ही दोन्ही मुले एकापाठोपाठ पाण्यात पडली. दरम्यान अतुल सूर्यवंशी यांनीही अंजलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली, त्यांनी अंजलीला पाण्याबाहेर काढले पण दोन्ही मुले पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडली. दोन्ही मुले लहान असल्याने त्यांना बचावाची संधीच मिळाली नाही. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.