पुणे - दोन सराईत गुन्हेगारांना दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसांसह खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुराव परिसरात करण्यात आली. ओंकार शिंगोरे (वय १९ वर्षे) आणि गणेश मोटे (वय २० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मर्गदर्शनाखाली सांगवी परिसरात विठ्ठल बढे यांचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी शैलेश सुर्वे, आशिष बोटके या दोघांना दोन सराईत गुन्हेगार हे पिंपळे गुराव परिसरात पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, या माहितीची खात्री करून बढे यांच्या पथकाने पिंपळे गुरव बसस्थानक येथे संबंधित सराईत गुन्हेगार ओंकार आणि गणेश यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कमरेला २ पिस्तुल आणि ३ जिवंत कडतुसे मिळाली आहेत. दरम्यान, दोघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. विनापरवाना हत्यार बाळगल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.