पुणे - संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या 334 व्या पालखी सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. सोमवारी (24 जून) संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यातून तसेच राज्याच्या बाहेरील वारकरी आणि भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत. हजारो वारकरी आणि भाविकांनी रविवारीच दर्शन बारीमध्ये उभे राहून दर्शन घ्यायला सुरुवात केली.
दरम्यान, यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी देहू मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. येणाऱ्या भाविकांना वारकऱ्यांना सुलभतेने दर्शन घेता यावे, पालखी प्रस्थान सोहळा पाहता यावा. यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे, तर पोलीस प्रशासनानेही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. शिवाय
मंदिर प्रशासनाने हजारो वारकऱ्यांसाठी प्रसादाची व्यवस्था केली आहे.
वैद्यकीय यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यात 339 दिंड्या सहभागी होणार आहेत. सोमवारी दुपारी चारनंतर तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान करेल, सोमवारी पालखीचा पहिला मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात असेल.