बारामती (पुणे) - नीरा मोरगाव रस्त्यावर शनिवारी ट्रक चालकाला लुटून 4 लाख 60 हजारांची रोकड लांबवण्याचा प्रकार घडला होता. मात्र, पोलीस तपासात हा बनाव असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ट्रक चालकानेच हा बनाव रचून ट्रकमध्येच रक्कम लपून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. शिवाजी बाळासाहेब ठोंबरे (रा.गिरीम ता. दौंड, जि. पुणे) असे या ट्रक चालकाचे नाव असून, त्याच्यावर वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अंकुश एकनाथ खताळ (रा. दौंड) हे कांद्याचे व्यापारी असून, त्यांनी ट्रकमधून कोल्हापूरला कांदा विक्रीसाठी पाठवला होता. कांदा विक्रीचे 3 लाख 59 हजार 486 रुपयांची पट्टी कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी ट्रक चालकाबरोबर पाठवली होती. मात्र, चालकाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नीरा- मोरगाव रोडवर चोरीचा बनाव करत काळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून चार व्यक्तींनी रक्कम लुटली असल्याचे पोलिसांना सांगितले. सदरची माहिती पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आदेश देऊन संपूर्ण पुणे जिल्ह्यात तसेच लोणंद येथे नाकाबंदी केली. सदरच्या स्कॉर्पिओ गाडीचा शोध घेण्याचा आदेश दिला होता.
यानुसार परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केले असता, अशा वर्णनाची कोणतीही गाडी दिसून आली नाही. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कवितके यांनी अधिक तपास केला असता, ही रक्कम ट्रकचालकाने ट्रकमध्ये साऊंडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अंकुश एकनाथ खताळ यांनी ट्रकचालकाविरोधात वडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवितके अधिक तपास करत आहेत. या घटनेचा काही तासातच वडगाव पोलिसांनी छडा लावल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.