पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगतीमार्गावरील मुंबई लेनचे काम सुरू आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक आज गुरुवारी वळवण्यात आली होती. मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून किवळे ब्रिज येथून जुन्या महामार्गावरुन वाहतूक सुरू होती.
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील मुंबई लेन कि.मी. ६५.५०० या ठिकाणी ओव्हरहेड गॅट्री बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक आज सकाळी १२ ते २ यावेळेमध्ये पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तसेच पर्यायी मार्ग म्हणून या मार्गावरील प्रवासी वाहतूक किवळे ब्रिज येथून जुना पुणे-मुंबई महामार्ग ने मुंबईकडे वळवण्यात आली. तर अवजड व मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किलोमीटर क्रमांक ६६ या ठिकाणी थांबविण्यात आली होती.
वाहतूक मार्गावर सुरू असलेल्या कामाची माहिती आणि वाहतूक मार्गात करण्यात आलेला बदल याची माहिती पुणे प्रादेशिक विभागाच्या महामार्ग सुरक्षा पथकाकडून देण्यात आली.